चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी येथे पुलावरून नदीपात्रात पडल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी येथे पुलावर उभा असताना तोल जाऊन नदीपात्रात पडल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत तरुणाचे नाव राजवर्धन किरण संगा (वय २०) असे आहे. तो मूळचा कन्ना चौंक, सोलापूरचा रहिवासी असून सध्या तो खेर्डी (ता. चिपळूण) येथील होंडा शोरूमजवळ राहात होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजवर्धन संगा हा त्याचा मित्र मोहम्मद नासीर अब्दुल रहीम खान याच्यासोबत ३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३५ वाजण्याच्या सुमारास तिवरे फणसवाडी येथील पुलावर उभा होता. त्यावेळी गाडीच्या काचा पुसत असताना अचानक तोल जाऊन तो पुलावरून खाली नदीपात्रात पडला. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर गंगेचीवाडी, तिवरे परिसरात नदीकाठावरील झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत राजवर्धन संगाचा मृतदेह आढळून आला. त्याला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मित्र मोहम्मद नासीर अब्दुल रहीम खान यांनी दिलेल्या माहितीवरून अलोरे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button