रुग्णांच्या आहाराची जबाबदारी आता महिला बचतगटांवर; २०० पेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयांचे मिळणार काम!


मुंबई : जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण भागांतील सरकारी रुग्णालयांत रुग्णांना आहार देण्याची जबाबदारी आता महिला बचतगटांवर सोपविण्यात आली आहे. २०० पेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयांतील आहार सेवा महिला बचत गटांमार्फत चालविण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

राज्याच्या महिला धोरणांअंतर्गत महिलांना रोजगार व उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रुग्णांना दर्जेदार, पौष्टिक आणि वेळेवर आहार मिळावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विविध सरकारी रुग्णालयांत आहार सेवा खासगी संस्थांकडून पुरविली जाते. मात्र सार्वजनिक आराेग्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता हे काम संबंधित तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (एमएसआरएलएम) नोंदणीकृत व पात्र महिला बचत गटांकडे हे काम सोपविले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळण्याचे अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.

१०० गुणांच्या निकषांवर होणार मूल्यमापन

महिला बचतग गटांची निवड ही गुणवत्तेवर आधारित होणार असून यामध्ये बचत गटाची कामगिरी, आहार सेवा व उद्योजकतेचा अनुभव, मनुष्यबळ, आर्थिक क्षमता आणि सामाजिक विश्वासार्हता या पाच निकषांच्या आधारे गुणांकन ठरणार आहे. १०० पैकी ८० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे गट यासाठी पात्र ठरणार आहेत, तर ७० ते ७९ गुण मिळवणाऱ्या बचतग गटांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयासाठी १० बचत गटांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गटाला एक वर्षासाठी कार्यादेश देण्यात येतील. समाधानकारक काम केल्यास मुदतवाढ दिली जाणार असून काम असमाधानकारक असल्यास पुढील गटाला संधी मिळेल.

एका रुग्णामागे १९१ रुपये

आहार सेवेचा अंदाजित दर सरकारने निश्चित केला असून प्रति रुग्ण प्रतिदिन मूलभूत आहारासाठी १४५ रुपये, इंधन, मनुष्यबळ व अन्य खर्चांसाठी २९ रुपये आणि महिला बचत गटांसाठी किमान १० टक्के नफा ग्राह्य धरून १९१.४० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. अन्न-सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय निवड व देखरेख समिती तसेच विभागीय पुनरावलोकन समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button