
सावर्डेतील महामार्गावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार महिला जखमी
वारंवार अपघातांमुळे नागरिकांत नाराजी; महामार्ग अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सावर्डे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथे आरती स्वीट्ससमोरील खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. चिपळूणच्या दिशेने जात असताना ॲक्टिव्हा खड्ड्यात आदळल्याने गाडीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातात त्यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे.
सावर्डे परिसरातील महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना तोंडी माहिती देण्यात आली आहे. तसेच चिपळूण पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही या समस्येकडे लक्ष वेधण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, वारंवार निदर्शनास आणून देऊनही खड्ड्यांबाबत योग्य ती कार्यवाही होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघातांना कारणीभूत ठरणारे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



