
चिपळूण रेल्वे स्थानकात नियोजनाच्या अभावाने सुशोभीकरणावर पाणी
चिपळूण रेल्वे स्थानकाचे अलीकडेच सुशोभीकरण करण्यात आले असून मुंबई-गोवा महामार्गापासून रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्याचेही कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, या विकासकामात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. परिणामी, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचून अक्षरश: तळ्याचे स्वरूप निर्माण होत आहे.
रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी रस्त्याच्या कडेला लहान व्यासाचे पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र, या पाईपांमध्ये माती व गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होत नसून संपूर्ण रस्ता जलमय होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे ये- जा करणारे प्रवासी, रिक्षाचालक आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



