रियाज हीच यशाची गुरुकिल्ली : केदार लिंगायत

रियाज तबला अकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नागिरी : “संगीतात रियाज हीच यशाची गुरुकिल्ली असून, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. परमेश्वराच्या कृपेने मिळालेली ही कला जोपासा, भरपूर रियाज करा आणि नवीन संधींचे सोने करा. संगीतासारखा आनंद जगात दुसरीकडे कुठेच नाही,” असा कानमंत्र रियाज तबला अकॅडमीचे केदार लिंगायत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येथील रियाझ तबला अकॅडमीच्या शिष्यवर्गातर्फे २९ जुलैला गुरुपौर्णिमा सोहळा ल. वि. केळकर सभागृह येथे उत्सवात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शिष्य आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. सुमारे सात-आठ तास चाललेल्या या कार्यक्रमाची सुरवात केदार लिंगायत, महेश दामले, अमित पाटील, अमोघ पेंढारकर, उदयराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली.
त्यानंतर स्वरा लिंगायत आणि स्वरा लाकडे यांनी राग बिहार सादर केला. त्याना संवादिनीसाथ महेश दामले यांनी तबलासाथ वरद जोशी याने केली. त्यानंतर वरिष्ठ शिष्यांचे तबलावादन झाले. त्यामध्ये कुणाल ठाकूरदेसाई, गिरीराज लिंगायत, गुरुप्रसाद लिंगायत, आदित्य दामले, अद्वैत मोरे यांनी एकताल तर संकेत पाडळकर याने ताल रुपक सादर केला.
अथर्व घाणेकर, गुरुप्रसाद पटवर्धन यांनी ताल झपताल, तर रुद्रांश लोवलेकर, प्रथमेश घाटे, गंधार पाटणकर, वरद जोशी यांनी ताल पंचम सवारी सादर केला. त्यानंतर कैलास दामले याने पखवाजवर ताल धमार आणि वरद जोशी याने ताल आडाचौताल, पुष्कर सरपोतदार याने ताल त्रिताल सादर केला. याना लेहरासाथ अमोघ पेंढारकर आणि हर्ष बोंडाळे यांनी केली.
त्यानंतर गुरू केदार लिंगायत यांचे शिष्यानी गुरुपूजन केले. गुरुजी ओम पाध्ये आणि ओमकार पाध्ये यांनी विधीयुक्त मंत्रोच्चाराद्वारे पठण केले. त्यानंतर काही पालक आणि शिष्यांनी गुरुप्रतीची भावना व्यक्त केली.
यावेळी केदार लिंगायत यांनी शिष्य आणि पालक याना मार्गदर्शन केले. २०१३ साली लावलेल्या या संगीत साधनेच्या रोपट्याचे आता एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाल्याचे नमूद करतानाच त्यांनी ‘बैठकीचे’ महत्त्व विशेष अधोरेखित केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बसण्याची शिस्त निर्माण होते. त्यांनी आपल्या शिष्यांना केवळ तबल्याचे शिक्षण दिले नाही, तर त्यासोबतच संस्कार आणि शिस्तीचे धडेही दिले.
त्यानंतर त्यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल त्रिताल सादर केला. त्याला श्रोत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मधुरा लाकडे यांनी तर ध्वनिसंयोजन उदयराज सावंत यांनी केले. कार्यक्रमस्थळी फुलांच्या पायघड्या उत्तम घाटे यांनी तर सुंदर रांगोळी श्री. घारपुरे यांनी काढली.
कार्यक्रमाला वरिष्ठ आणि उदयोन्मुख कलाकार उपस्थित राहिले त्यांचे स्वागत पुष्प देवून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button