साडेसात महिन्यांनंतर राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण


राजापूर : सुमारे साडेसात महिन्यांच्या विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई पुन्हा प्रवाहित झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर मूळ गोमुखातून सुरू झालेला पाण्याचा प्रवाह आता अधिक वेगाने वाहू लागला असून परिसरातील इतर कुंडांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे राजापूर गंगा परिसरात पुन्हा भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
यंदा ८ जुलै रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची नोंद झाली होती. त्यानंतर मूळ गोमुखातून अल्प प्रमाणात सुरू झालेला पाण्याचा प्रवाह गेल्या काही दिवसांत वाढला आहे. मुसळधार पावसामुळे या प्रवाहात आणखी भर पडली असून गोमुखातून सातत्याने वाहणारे पाणी आणि पाण्याने भरलेली कुंडे पाहण्यासाठी नागरिक, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने राजापूर गंगा परिसराला भेट देत आहेत.
कोकणातील एक अद्वितीय नैसर्गिक आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूर गंगेला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पूर्वी गंगामाईचे आगमन ठराविक कालावधीनंतर होत असे. साधारणपणे डिसेंबर किंवा जून महिन्यात गंगामाई प्रकट होऊन दोन ते आठ आठवडे प्रवाहित राहत असे. त्यानंतर पुन्हा सुमारे तीन वर्षांनी तिचे आगमन होत असल्याची परंपरा होती. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये या चक्रात लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी गंगामाईच्या आगमनावेळी देशभरातून हजारो भाविक राजापूरमध्ये दाखल होत असत. त्यामुळे स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळत असे. मात्र अलीकडील काळात गंगामाईचे आगमन तुलनेने वारंवार होत असल्याने त्याबाबतचे आकर्षण काहीसे कमी झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. या नैसर्गिक घटनेमागील भूगर्भशास्त्रीय, जलशास्त्रीय आणि पर्यावरणीय कारणांचा सखोल अभ्यास करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गंगामाई पुन्हा प्रवाहित झाल्याने राजापूरकरांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी काही दिवसांत दर्शनासाठी भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button