
रानतळे येथे एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
राजापूर : शहरानजीक रानतळे येथे मंगळवारी (दि. २८ जुलै) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर–भवानीमंदिर ही एसटी बस रानतळे मार्गे जात होती. त्याचवेळी भालावली–राजापूर ही एसटी बस राजापूरच्या दिशेने येत होती. भालावली–राजापूर बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दोन्ही बसांच्या दर्शनी काचा, आरसे तसेच बंपरचे नुकसान झाले. अपघातानंतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेची माहिती मिळताच राजापूर आगाराच्या आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर आणि वाहतूक निरीक्षक स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून त्यांच्या गंतव्यस्थानी रवाना करण्यात आले.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.




