
अनुस्कुरा घाटात रस्त्यावर पडलेला महाकाय दगड NSS स्वयंसेवकांनी हटवला; संभाव्य अपघात टळला
राजापूर : तालुक्यातील पुणे–कोल्हापूर महामार्गावरील अनुस्कुरा घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक महाकाय दगड रस्त्याच्या मध्यभागी येऊन पडला होता. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. घाटात दाट धुके असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला होता. अशा परिस्थितीत खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या स्वयंसेवकांनी प्रसंगावधान राखत एकजुटीच्या बळावर हा दगड रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत केली.
वृक्षारोपण मोहिमेसाठी अनुस्कुरा घाटात गेलेल्या स्वयंसेवकांना रस्त्याच्या मध्यभागी पडलेला महाकाय दगड दिसताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. कोणतीही यंत्रसामग्री उपलब्ध नसतानाही सर्व स्वयंसेवकांनी एकत्रित प्रयत्न करत दगड हाताने ढकलून रस्त्याच्या कडेला हलवला. त्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग तातडीने मोकळा झाला.
अनुस्कुरा घाटातील दाट धुके आणि तीव्र वळणावर हा दगड असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र स्वयंसेवकांच्या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळल्याची भावना प्रवासी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी दगड हटविण्याबरोबरच परिसराची स्वच्छताही करून वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला.
या उपक्रमावेळी खापणे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, श्री. मधुकर साटम यांच्यासह स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे नियोजित काम काही काळ बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी आणि तत्परता याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संबंधित विभागाने या विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.




