
रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
कावीळच्या आजाराने त्रस्त असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान उप जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश पालवे (वय ३३ वर्ष, रा. मधलीवाडी फणसवळे, ता. जि. रत्नागिरी) याला मागील एका महिन्यापासून कावीळचा त्रास सुरू होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. दि. २३ जुलै रोजी घरी असताना अचानक त्याचे पोट फुगले आणि त्याला तीव्र त्रास होऊ लागला. त्यानंतर वडिलांनी त्याला तातडीने खासगी वाहनाने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील आयसीयू विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना, दि. २४ जुलै रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.




