
एसटी डेपोसमोरील राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा उपाययोजनांची मागणी
उपनगराध्यक्ष विनय गुरव यांचे आमदार किरण सामंत यांना निवेदन
राजापूर : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी तातडीने विविध सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी राजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजापूर एसटी डेपोसमोरील राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरून गुरववाडी, बंगलवाडी परिसरातील नागरिकांसह स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक आणि राजापूर अर्बन बँकेत येणारे पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात अपघाताचा धोका कायम असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर एसटी डेपोसमोरील बँकांकडे जाण्यासाठी चारचाकी वाहने सहज जाऊ शकतील असा प्रशस्त पूल उभारण्यात यावा, जंक्शनवर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी तसेच जंक्शनपूर्वी वेगमर्यादा कॅमेरे बसवून भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
याशिवाय नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि वाहनचालक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामांना प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशीही मागणी विनय गुरव यांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच वाहनचालक उपस्थित होते.
दरम्यान, या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक ती तातडीची उपाययोजना करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिल्याचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी सांगितले.




