
भूखंड घेऊन उद्योग उभा न करणार्या उद्योजकांचे भूखंड रत्नागिरी नगर परिषद ताब्यात घेणार
रत्नागिरी झाडगाव येथील लघुउद्योग आणि मत्स्यउद्योग वसाहतींमधील अनेक भूखंडांवर उद्योग सुरू न झाल्याचे समोर आल्यानंतर रत्नागिरी नगर पालिका प्रशासनाने अशा भूखंडधारकांविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली आहे. उद्योग सुरू न करता भूखंड पडून ठेवणार्यांकडील भूखंड ताब्यात घेण्यासाठी नगर परिषदेकडून प्रत्यक्ष स्थळ पाहाणी सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेने झाडगाव औद्योगिक वसाहतीत ७० लघुउद्योग आणि ५६ मत्स्यउद्योग भूखंडाचे ३० वर्षांच्या करारावर वाटप केले आहे. संबंधित भूखंडांच्या क्षेत्रफळानुसार नगर परिषदेकडून भाडे आकारले जात असले, तरी अनेक लाभार्थीनी अद्याप उद्योग सुरू न करता केवळ भाडे भरून भूखंड रिकामे ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि सर्व नगरसेवकांनी शहराचे अर्थकारण मजबूत करण्याच्या दृष्टीने या प्रश्नाचा गंभीर दखल घेतली आहे. उद्योग सुरू न झालेल्या भूखंडांचा ताबा घेऊन ते प्रत्यक्ष उद्योग उभारण्यास इच्छुक नव्या उद्योजकांना देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
उद्योग सुरू झाल्यानंतर संबंधित मालमत्तेवरून नगर परिषदेला घरपट्टी व अन्य करांच्या स्वरूपात उत्पन्न मिळते. मात्र, उद्योगच सुरू नसल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहाणी करून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, पडून असलेल्या किंवा बंद असलेल्या भूखंडांबाबत लवकरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.




