
सायबर गुन्हेगाराना रत्नागिरी पोलिसांचा दणका, गुन्हेगारांविरूद्ध व्यापक मोहीम
महाराष्ट्रात वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवत सायबर गुन्हेगारांच्या नेटवर्कवर मोठा प्रहार केला आहे. महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार ही व्यापक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत सायबर फसवणुकीसाठी स्वतःची बँक खाती वापरण्यास देणार्या ११ म्युल अकाऊंट धारकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारांना आर्थिक व्यवहारांसाठी मदत करणार्यांवर थेट कारवाई केल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याशिवाय, मनी रिस्टोरेशन मॉड्यूल अंतर्गत ६८ संशयास्पद व्यवहारांमध्ये तातडीने हस्तक्षेप करून २ लाख ४२ हजार ५९७ इतकी रक्कम पीडित नागरिकांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर फसवणुकीच्या तक्रारींच्या निवारणातही रत्नागिरी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जानेवारी २०२६ पासून प्राप्त झालेल्या मोठ्या फसवणुकीच्या २१ तक्रारींपैकी १४ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ग्रीव्हन्स रिड्रेसल मॉड्यूल अंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व १२ तक्रारींचे शंभर टक्के निवारण करण्यात आले आहे.
सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा ुुु.लूलशीलीळाश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर ऑनलाइन तकार नोंद्वावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केले आहे.




