
रत्नागिरीत एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत अटकेत; ३४ कार्डे जप्त
रत्नागिरी : एटीएम कार्ड बदलून नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून विविध बँकांची ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय फसवणूक रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विश्वनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात ही घटना घडली. नवीन एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी आलेल्या एका महिलेला आरोपीने मदत करण्याचा बहाणा केला. यावेळी हातचलाखीने त्यांचे कार्ड बदलून घेतले आणि मोबाईलद्वारे ओटीपीची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातून पैसे काढले. मोबाईलवर व्यवहाराचा संदेश आल्यानंतर संबंधित महिलेने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. मांडवी परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सुरत, गुजरात) असे असून, त्याच्याकडून ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. तपासात त्याच्याविरुद्ध गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक, चोरी आणि दरोड्याचे आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.




