
नाणीज येथे शाळकरी मुलींना बसमधून उतरवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज बस थांब्यावर ११ जुलै रोजी पास असलेल्या शाळकरी विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवून दमदाटी केल्याच्या प्रकरणाने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे.
११ जुलै रोजी दुपारी लांजा आगाराच्या ‘पाली-घाटीवळे’ बसने नाणीज येथे ४ शाळकरी मुलींना “आधी पैसे भरा” म्हणत पास नाकारून बसमधून खाली उतरवले होते. यामुळे त्या मुली बस थांब्यावरच रडत बसल्या होत्या. या घटनेमुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली असून, युवासेनेने पुढाकार घेत यासंदर्भात मागणीचे निवेदन दिले आहे.
संबंधित पाली-घाटीवळे बसचे चालक आणि वाहक यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे, लहान मुलींवर दमदाटी करून त्यांना असुरक्षित सोडल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व चालक-वाहकांना विद्यार्थ्यांशी, विशेषतः विद्यार्थिनींशी सौजन्याने वागण्याचे कडक आदेश देण्यात यावेत, अशा ठोस मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व शिस्तभंगविषयक कारवाई झाली नाही, तर युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने रत्नागिरी आगारावर तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे एसटी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा युवासेनेने दिला आहे.




