
रत्नागिरी जिल्ह्यात जिओ हायड्रोलॉजिकल मॅप तयार करण्याचे काम सुरू होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील भूजल साठ्याची अचूक माहिती उपलब्ध करून पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिओ हायड्रोलॉजिकल मॅप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील विविध भागांतील विहिरींचे जिओ-टॅगिंग आणि तांत्रिक सर्वेक्षण सुरू असून, त्यातून जमिनीखालील खडकांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि भूजलाची स्थिती स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोंधळी यांनी दिली.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी), नागपूर वांच्या माध्यमातून उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील विहिरींचे जिओ-मॅपिंग करण्यात आले आहे. या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या विशेष नकाशांवर जिल्ह्यातील विद्यमान विहिरींची अचूक नोंद करण्यात आली आहे. या नकाशांच्या आधारे भूजल विभागाचे भूवैज्ञानिक प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन प्रत्येक विहिरीची सविस्तर पाहणी करत आहेत. पाहाणीदरम्यान विहिरीतील पाण्याची पातळी, एकूण खोली, पाणी साठवण्याची क्षमता, तसेच परिसरातील भूगर्भीय रचना याची नोंद केली जात आहे. विशेषतः संबंधित भागातील बेसॉल्ट किंवा लॅटेराइट (जांभा) खडक यांचा प्रकार आणि त्या खडकांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता याचाही अभ्यास केला जात आहे.




