
राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या महिलांना न्यायालयाचा दणका !
भररस्त्यावर मासेविक्री महागात; १२ महिलांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड. राजापूर न्यायालयाचा आदेश; दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कारावासाचीही तरतूद
राजापूर : शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ या मुख्य मार्गावर सार्वजनिक ठिकाणी मासेविक्री करून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने १२ मासेविक्रेत्या महिलांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती हाक्के यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात एकूण २४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून सर्व महिलांनी गुन्ह्याची कबुली देत दंडाची रक्कम न्यायालयात भरली.
दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजी पथ ते बाजारपेठ या मार्गावर संबंधित महिला भररस्त्यावर मासेविक्री करत होत्या. मासे साफ करताना खवले व सांडपाणी रस्त्यावर टाकल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली होती. राजापूर नगर परिषदेने मासेविक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली असतानाही नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी राजापूर नगर परिषदेचे मुकादम राजन रामचंद्र जाधव यांनी १४ मार्च २०२६ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ मधील कलम २६७ व २७९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ११५ अन्वये १२ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रत्येक आरोपीस दोन हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास सात दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्व आरोपी महिलांनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली देत दंडाची रक्कम भरल्याने कारावासाची वेळ टळली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केला, तर न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी सचिन बळीप यांनी भूमिका बजावली.




