उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ठाकरे गट करणार कायदेशीर मदत!

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

त्याचप्रमाणे ज्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत तसेच ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांना शिवसेनेकडून (ठाकरे) सर्व कायदेशीर सहकार्य करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

नीट पेपरफुटी विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक तरूण विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे प्रत्यक्ष भेटून त्यांच्या भूमिका आणि समस्या जाणून घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांना पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनालाही उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला होता. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांबाबत शिवसेनेची भूमिका कायम ठाम राहिली असून, त्याच भूमिकेचा भाग म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत, असे आदित्य यांनी स्पष्ट केले.

कायदेशीर सहकार्य

सोनम वांगचुक यांच्या उपोषणात अनेक विद्यार्थी सहभागी असून, संसदेकडे निघालेल्या मोर्चावर सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. ‘अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी सरकारचे मंत्री चर्चेसाठी पुढे आले होते, मात्र आता एकही मंत्री विद्यार्थ्यांशी बोलायला तयार नाही,’ असे ते म्हणाले.

चैत्यभूमीवरील शांततापूर्ण आंदोलनातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. संसदेवर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर मोदी सरकारकडून लाठीहल्ला करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, तर काहींना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आजही शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले होते, त्यांना मदत करण्यासाठी आमचे सहकारी पोलिस ठाण्यात गेले होते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ज्या आंदोलकांना कायदेशीर नोटीस आली असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून shivsenaubtlegal@gamil.com हा ईमेल जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व वकिलांनी या विद्यार्थ्यांचे खटले मोफत लढावेत, असे आवहनही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button