
उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! ‘सीजेपी’च्या आंदोलनाला दिली भेट
दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर अभिजित दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. मागच्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरु असून सोमवार, दि. २० जुलै रोजी आंदोलनात गोंधळ उडाला.आंदोलनात सहभागी तरुणांवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होतोय. अनेक नेते दिल्लीत जंतरमंतरवर दाखल होत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री १० वाजल्यानंतर आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी यांनी केंद्र सरकारवर सणसणीत टीका करत, सत्ताबदल झाल्याशिवाय परिस्थितीत बदल होणार नाही; असं म्हणत आंदोलनाची व्याप्ती देशभर बुलंद करण्याचा मनोदय व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हे लोक तुम्हाला दहशतवादी म्हणत आहेत. एवढ्या निर्दयीपणे सरकारने तुमच्यावर हल्ला केला, ते निषेधार्ह आहे. काही गुंड तुमच्यावर लाठीहल्ला करीत होते. आज कुणीही खुर्चीवर असलं तरी उद्या तुमच्यापैकी अनेकजण खुर्चीवर बसलेले असतील. येणारा काळ माझ्यासमोर उभा आहे.ठाकरे पुढे म्हणाले, अभिजितला धन्यवाद देतो, त्याने हे आंदोलन पुकारलं. त्याला अमेरिकेतून येण्याची गरज नव्हती. परंतु त्याला देशातील परिस्थिती बघवली नाही, त्यामुळे तो भारतात माघारी आला. माझ्या स्वतंत्र भारतात विद्यार्थी जर पेपर लीकमुळे आत्महत्या करीत असतील तर हे गंभीर आहे. आता आपली लढाई सुरु झाली आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवावे लागणार आहे.
”आपल्याला सरकार बदलायचं आहे.. सरकार बदलणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात बदल होणार नाहीत. संपूर्ण देशात हे आंदोलन पेटलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचा एक युवक या आंदोलनाचं नेतृत्व करीत आहे, याचा मला अभिमान आहे.” अशा शब्दांत ठाकरेंनी आंदोलकांना साद घातली.उद्धव ठाकरे शेवटी म्हणाले, तुम्हाला हिंमत द्यायला आणि तुमच्याकडून हिंमत घ्यायला मी इथे आलेलो आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. धर्माच्या नावावर भिंती उभा करणाऱ्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत, आज संपूर्ण राष्ट्राची भावना एकच झाली आहे. मी या आंदोलनासोबत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे बुधवार, दि. २२ जुलै रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. ते काय बोलतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.




