सिंधुरत्न समृद्ध योजनेतून खेडमध्ये १.४० कोटींचे अनुदान वितरण

मूल्यवर्धित दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळावे : गृहराज्यमंत्री योगेश कदम

खेड : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद रत्नागिरीच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने खेड येथील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात सिंधुरत्न समृद्ध योजना २०२५-२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे (गाय/म्हैस) खरेदीसाठी अनुदान वितरण समारंभ उत्साहात पार पडला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे होत्या. कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समितीचे सभापती महेश नाटेकर यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, सदस्य महेंद्र भोसले, गटविकास अधिकारी विजय करपे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शंकर कांगणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना योगेश कदम यांनी सांगितले की, सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत खेड तालुक्यातील १५३ लाभार्थ्यांना सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी, टॅगिंग आणि आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
उर्वरित १३२ लाभार्थ्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यांनाही लवकरच सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत खेड तालुक्यात एकूण सुमारे अडीच कोटी रुपयांचे अनुदान वितरित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत मूल्यवर्धित दुग्ध व्यवसायाचा स्वीकार करून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन योगेश कदम यांनी केले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील सुमारे ८० टक्के पदे रिक्त असल्याने सेवा पुरविण्यात अडचणी येत असून, ग्रामीण भागात फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी आमदार संजय कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनीही मनोगत व्यक्त करत सिंधुरत्न समृद्ध योजनेमुळे ग्रामीण भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. संजय पवार आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. दत्तात्रय झंजाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button