गुहागरमध्ये बेपत्ता व्यक्तीचा सांगाडा सापडला; कपड्यांच्या आधारे ओळख निश्चित


गुहागर : गेल्या मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा हाडांचा सांगाडा शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी तालुक्यातील मुंढर-ओवळणवाडी परिसरातील माळरानावर आढळून आला. कपड्यांच्या आधारे मृताची ओळख प्रमोद धोंडू कांबळे (वय ४५) अशी पटली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रमोद कांबळे हे मे महिन्यापासून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी गुहागर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.

शुक्रवारी सकाळी ओवळणवाडी परिसरातील माळरानावर अळंबी गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाला मानवी हाडांचा सांगाडा दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला.

सांगाड्याजवळ मिळालेल्या कपड्यांवरून मृताची ओळख प्रमोद कांबळे अशी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना फिट्सचा त्रास असल्याने झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, गुहागर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button