
आंदोलनकर्त्यांची धरपकड,जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर आज सकाळी सव्वा सात वाजता दिल्ली पोलिसांनी अचानक कारवाई करत उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.सोनम वांगचूक हे गेल्या २० दिवसांपासून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे उपोषण करत असून आज त्यांच्या उपोषणाचा २१ वा दिवस होता. उपोषणामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांचे वजन ९ किलोहून अधिक घटल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
सकाळी सव्वासात वाजता कारवाई
शनिवारी सकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास मोठ्या संख्येने दिल्ली पोलिसांचे जवान जंतर-मंतर येथे दाखल झाले. त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित सोनम वांगचूक आणि इतर आंदोलनकर्त्यांना हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही काळ धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना जंतर-मंतर परिसरातून हटविण्यात आले.




