राजापूर पोलिसांची मोठी कामगिरी

सायबर फसवणुकीतील ३ लाखांची रक्कम परत मिळवून दिली; पुणे परिसरातील पाच संशयितांवर कारवाई माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या प्रकरणाचा उलगडा; मुख्य सूत्रधार अद्याप फरार

राजापूर : राजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांच्या मोबाईलवर बनावट RTO E-Challan.apk फाईल पाठवून करण्यात आलेल्या सायबर फसवणुकीचा राजापूर पोलिसांनी यशस्वी तपास लावत तब्बल ३ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली आहे. या प्रकरणात पुणे व परिसरातील पाच संशयितांवर कारवाई करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजापूर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ॲड. जमीर खलिफे यांचे वडील निजामउद्दीन खलिफे यांच्या व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीकडून RTO E-Challan.apk नावाची फाईल पाठविण्यात आली होती. वाहन क्रमांक व ई-चलनाचा उल्लेख असलेला हा संदेश त्यांनी ॲड. जमीर खलिफे यांच्या मोबाईलवर पाठविला. संबंधित फाईल उघडताच त्यांच्या मोबाईलवर आधार प्रमाणीकरणासंदर्भातील संदेश आला आणि काही वेळातच इंडसइंड बँकेतील त्यांच्या खात्यातून ३ लाख रुपये ऑनलाइन डेबिट झाल्याचा संदेश प्राप्त झाला.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ॲड. खलिफे यांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वरही तक्रार नोंदविण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम पुणे येथील फिनकॉर्प कंपनीमार्फत घेतलेल्या कर्ज खात्यांमध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपनिरीक्षक मोबीन शेख यांना पुणे येथे पाठविण्यात आले.
तपासात मितेश जालींदर वाघुले, किरण मच्छिंद्र नेहरकर, विजय काशीनाथ व्होरहाडे, दत्तात्रय गंगाराम गवारी आणि गंधार संजय रत्नपारखी हे संशयित समोर आले. या सायबर रॅकेटचा मुख्य सूत्रधार शादाब अन्सारी असून तो अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सखोल चौकशीत फसवणुकीची रक्कम मितेश वाघुले आणि किरण नेहरकर यांच्या फिनकॉर्प कर्ज खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत संपूर्ण ३ लाख रुपयांची रक्कम ॲड. जमीर खलिफे यांच्या खात्यात परत वर्ग केली.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. कमिशनच्या मोबदल्यात इतरांच्या नावावर कर्ज खाती उघडून त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने राज्यातील किंवा इतर भागांत अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख तसेच पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार आणि दीपक काळे यांनी या तपासात विशेष परिश्रम घेतले.
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा : अमित यादव
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी अनोळखी क्रमांकांवरून आलेले कॉल, संदेश, APK फाईल किंवा संशयास्पद लिंक कधीही उघडू नयेत. बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. आर्थिक फसवणुकीची शंका आल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button