रत्‍नागिरी विमानतळाचे ८० टक्‍के काम पूर्ण!

Ratnagiri Airport : रत्नागिरीकरांच्‍या विमान प्रवासाचे स्वप्न आता जवळ येऊन ठेपले आहे. रत्नागिरीतील प्रस्तावित हायटेक विमानतळाचे मुख्य काम तब्बल ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्‍थितीत आढावा बैठक घेऊन या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले. यावेळी त्‍यांनी अंतर्गत रस्‍त्‍याच्‍या कामावरून नाराजी व्‍यक्‍त करत ठेकेदाराला सूचना दिल्‍या.

या बैठकीला विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, एमआयडीसीचे अभियंता बी. एन. पाटील, न्याती कंपनीचे अधिकारी आणि अंतर्गत रस्त्यांचे काम करणारे ठेकेदार पाटील उपस्थित होते.

या बैठकीत विमानतळाच्या कामाचा वेग वाढवण्यावर चर्चा झाली. विमानतळाचे मुख्य बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी अंतर्गत रस्त्यांचे काम सध्या काहीसे संथ गतीने सुरू असल्याबद्दल आमदार सामंत यांनी तीव्र शब्‍दात नाराजी व्‍यक्‍त केली. हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार पाटील यांनी ‘रवी इन्फ्रा’ कंपनीची मदत घ्यावी व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना आमदार सामंत यांनी दिल्या. विमानतळावरील इलेक्ट्रिकल कामे आता पूर्णत्वाकडे आली असून, पायाभूत सुविधांना वेग आला आहे.

रत्नागिरीचे विमानतळ सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आणि पूर्णपणे ‘हायटेक’ केले जाणार आहे. या भव्य प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून शासन स्तरावरून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेतच हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे आणि रत्नागिरीकरांना लवकरच विमान सेवेची भेट मिळाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आमदार सामंत यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button