रत्नागिरीसह चार जिल्ह्यांतील १,३६० खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी


खासगी रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या कायदेशीर व तांत्रिक निकषांचे पालन होत आहे का, याची पडताळणी करण्यासाठी रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,३६० खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, आरोग्य विभागाच्या कोल्हापूर मंडळाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपसंचालक (आरोग्य सेवा), कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जिल्हानिहाय विशेष तपासणी पथके गठित करून नोंदणीकृत खासगी रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जाणार आहेत.

तपासणीदरम्यान रुग्णालयात रुग्णशुल्क व इतर सेवा शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, रुग्ण हक्क सनद प्रदर्शित केली आहे का, अग्निसुरक्षा (फायर ऑडिट) पूर्ण झाले आहे का, तसेच बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन होत आहे का, याची सखोल पडताळणी केली जाईल.

नियमांचे उल्लंघन, आवश्यक सुविधांचा अभाव, खोटी माहिती, बेकायदेशीर कामकाज किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित रुग्णालयांविरुद्ध कायद्यानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button