रत्नागिरी जिल्ह्यातील बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी दंड थकवणार्‍या मच्छिमारांच्या सातबारावर चढणार बोजा


रत्नागिरी जिल्ह्यातील बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाने यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. समुद्र किनार्‍यांवर आणि सागरी हद्दीत ड्रोनद्वारे सतत नजर ठेवत अवैध मासेमारी करणार्‍या नौकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ५३२ मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ५० लाख ३३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दंड न भरणार्‍या मच्छीमारांविरोधात महसूल विभागाच्या साध्यमातून कारवाई केली जाणार असून, त्यांच्या जमिनीवर महसूल थकबाकी म्हणून ७/१२ उतार्‍यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दंड थकविणार्‍या मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे.
यंदाच्या मासेमारी हंगामात जिल्ह्यात अवैध पर्ससीन, ट्रॉलिंग आणि एलईडी मासेमारीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पारंपरिक मच्छीमारांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारी आणि सागरी जैवसंपदेचे संरक्षण लक्षात घेऊन मत्स्य विभागाने ड्रोन कॅमेर्‍यांच्या मदतीने समुद्रातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. ड्रोनमध्ये कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे संबंधित नौका आणि नौकामालकांची ओळख पटवून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मत्स्य विभागाच्या आकडेवारीनुसार, अवैध पर्ससीन मासेमारी करणार्‍यांवर ५२ लाख रुपयांचा, ट्रॉलिंगद्वारे अवैध मासेमारी) करणार्‍या नौकामालकांवर ७ लाख रुपयांचा तर एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणार्‍यांवर ४५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button