
रघुवीर घाटात भीषण भूस्खलन; रस्त्याची एक बाजू थेट दरीत वाहून गेली, १५ गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार, ढगफुटीसदृश पावसामुळे भीषण भूस्खलन झाले असून घाटातील रस्त्याची एक बाजू थेट दरीत वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी प्रचंड दरडी कोसळल्याने संपूर्ण घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १५ गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाट परिसरातील डोंगर मोठ्या प्रमाणात खचले आहेत. अनेक ठिकाणी माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे घाटातील रस्त्याचा मोठा भाग दरीत कोसळल्याने या मार्गाची मोठी हानी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी आणि अन्य अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी रस्त्याचाच मोठा भाग वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रघुवीर घाट हा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे आकर्षण मानला जातो. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे हा घाट अत्यंत धोकादायक बनला असून परिसरात आणखी भूस्खलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विविध ठिकाणी डोंगर खचणे, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटना घडत असल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने धोकादायक भागांवर लक्ष ठेवून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





