
रत्नागिरी रेल्वे स्थानक दुर्घटनाप्रकरणी दोषी ठेकेदाराला काळया यादीत टाका: मनसेची मागणी
रत्नागिरी :- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांसहित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी श्री मनुज जिंदल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकातील सजावटीच्या छताचा काही भाग पुन्हा कोसळला आहे.उद्घाटना पूर्वीही अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे कामाच्या गुणवत्तेवर, प्रवाशांच्या सुरक्षेवर आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.रविवार दिनांक ५ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ११.०० च्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे रिक्षा स्टँडकडील छताचा मोठा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली.
वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करण्यात आले होते आतापर्यंत सदरहू निकृष्ट व दर्जाहीन सुशोभीकरणाच्या कामात छत कोसळल्याचे दोन वेळा दुर्दैवी प्रकार घडलेले असून सुदैवाने त्यात जीवितहानी झालेली नाही परंतु या कामाचा निकृष्ट दर्जा पहाता भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही सबब या संपूर्ण कामाची निष्पक्ष चौकशी करून या कामाचे ऑडिट करण्यात यावे व संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळया यादीत टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात यावी अशी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन दिले असून या गंभीर घटनेची प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास मनसे पद्धतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने आपल्या निवेदनात दिला आहे.



