भोस्ते घाटात महामार्गाला तडे; मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला


: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात मुसळधार पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटातील दरीकडील भागात जमीन खचू लागल्याने नव्याने बांधलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी खोल तडे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

रस्त्यावरील भेगा बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून सिमेंट भरून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली, तरी जमिनीचे खचणे सुरूच असल्याने काही ठिकाणी पुन्हा भेगा दिसून येत आहेत. सततच्या पावसामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असून भूस्खलनाचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भोस्ते घाटातून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि जोरदार पावसात वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने तज्ज्ञांकडून पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. संरक्षणभिंत उभारणे, उताराचे स्थिरीकरण आणि आवश्यक अभियांत्रिकी उपाय त्वरित राबविण्यात यावेत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button