महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॕड संजय पुराणिक


*रत्नागिरी, :- महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॕड संजय पुराणिक यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क सरंक्षण आयोग मुंबई आयोजित अर्ध न्यायिक सुनावणी व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सचिव पंकज देवरे (भा.प्र.से), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अतुल देसाई, प्रविण भुजाडे, सदस्या गितांजली बुटी, शुभांगी तांबट, मिलन जंगम (मिलन गुरव), जिल्हा पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, परिविक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते.
बालकांचे हक्क, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आणि सन्मान यांचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तसेच आजच्या डिजिटल आणि वेगाने बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरील आव्हाने अधिक गंभीर स्वरूपाची होत असून त्यासाठी संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज असेही अॕड पुराणिक यांनी सांगितले.
बालकांशी संबंधित बातम्या प्रकाशित अथवा प्रसारित करताना बालकांच्या गोपनीयतेचे, सन्मानाचे आणि कायदेशीर अधिकारांचे पालन करण्यात यावे. विशेषतः लैंगिक अत्याचार, बाल गुन्हे, कौटुंबिक वाद, बालमजुरी, बालविवाह किंवा बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये संबंधित बालकांची ओळख उघड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. बालकांचे फोटो, नाव, शाळा, पत्ता किंवा ओळख पटेल अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध करु नये. प्रसारमाध्यमे ही समाजाला दिशा देणारी प्रभावी शक्ती आहे. त्यामुळे पत्रकारांनी केवळ घटना मांडण्यापुरते मर्यादित न राहता बाल संरक्षण, शिक्षण, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, मुलींची सुरक्षा, बालकांवरील ऑनलाईन व निरनिराळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट धोके, तसेच संविधानिक मूल्ये तसेच सामाजिक नीतिमूल्य घटनात्मक नागरिक कर्तव्य या विषयांवर जनजागृतीपर सकारात्मक प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन आयोगाच्यावतीने करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा हा सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन ‘बालस्नेही समाज’ निर्माण करण्यासाठी माध्यमांनी तसेच समाजसेवी संस्थांनी व प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
बालकांचे संरक्षण हे केवळ कायदेशीर कर्तव्य नसून, मानवतेचे मूल्य आहे. प्रत्येक बालक सुरक्षित, शिक्षित आणि सन्मानाने जगेल यासाठी शासन, प्रशासन, पालक, शाळा, माध्यमे आणि समाज यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या असलेल्या बालकांविषयीच्या विविध योजनांचा लाभ बालकांना मिळवून द्यावा. बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याने त्याबाबत जनजागृती करावी तसेच बालमजुरी सुद्धा गुन्हा असल्याने बालमजुरी विरोधी कृती समिती चाईल्ड लेबर सेल यासारख्या यंत्रणांनी सक्रिय होऊन आपला जिल्हा बालमजुरी मुक्त कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
शैक्षणिक संस्था शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठीत कराव्यात, ज्यामुळे बालक व विद्यार्थी सुरक्षित झाला की शाळा व मुल सुरक्षित होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर तसेच शहरी भागात प्रत्येक वॉर्ड स्तरावर बाल संरक्षण समिती गठीत झाली नसल्यास गठित कराव्यात आणि गठीत असल्यास सक्षम करण्याच्या सूचना बाल हक्क संरक्षण आयोगाने केल्या.
महिला व बालकांच्या समस्यांबाबत कोणतीही तक्रार नोंदवायची असल्यास व अधिक माहितीसाठी आयोगाच्या mscpcr@gmail.com ई-मेलवर, mscpcr.org या वेबसाई व chirag App यावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button