
रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान..!
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत 70 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या 16 विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रभागातील विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास करून मिळवलेल्या यशाचा अभिमान बाळगून व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम भाजपा शहर सरचिटणीस श्री. निलेश आखाडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत जाणून घेणे आणि आवश्यक असल्यास योग्य ते मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला, असे निलेश आखाडे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. करिअरच्या दृष्टीने पुढील शिक्षणाची निवड कशी करावी याबत मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक बाबतीत कोणतीही मदत हवी असल्यास आम्हाला कधीही संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. तसेच सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्रांसाठी फोल्डर फाईल व वह्या देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस श्री. निलेश आखाडे, पूजा पवार, सौ. प्रज्ञा टाकळे, सौ. निधी निलेश आखाडे, श्री. तेजस पवार यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




