जिल्हा विकासात्मक प्रस्तावित योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा अनावश्यक प्रस्ताव नकोत ; शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे रोपे हवीत


रत्नागिरी, दि. 6 ) :जिल्ह्याच्या विकासात्मक विविध विभागांच्या प्रस्तावित योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. भाड्याच्या जागेत असणाऱ्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विभाग प्रमुखांनी प्रस्ताव करताना तो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवावा. त्याचबरोबर जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून अनावश्यक प्रस्ताव करु नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. तर शेतकऱ्यांना आवश्यक असणारी, गावांच्या मागणीप्रमाणे वन विभागाने रोपे द्यायला हवीत, अशी मागणी आमदार किरण सामंत यांनी यावेळी केली.
या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव योगेश महांगडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
विविध विभागांकडे भूसंपादित असणारी परंतु, वापरात नसलेल्या जमिनीची माहिती संकलित करुन द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राने इमारतीमधील गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करावी. सीएमएजीपी, पीएमएजीपी योजनेचे उद्दिष्ट, सफलता, कर्जमाफी याविषयी अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी सर्व बँकर्सची बैठक आयोजित करावी. सर्व यंत्रणांनी प्रस्ताव करताना ते जिल्हाधिकारी कार्यालयार्फत द्यावेत. जिल्ह्याला अनावश्यक प्रस्ताव करु नयेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी महिला सक्षमीकरण भवन असा विचार करुन प्रस्ताव तयार करावेत. लोटे परशुराम येथे आणि रत्नागिरी येथे इएसआय रुग्णालय सुरु करण्याबाबत सहाय्यक आयुक्त कामगार विभागाने समन्वय करावे. वन विभागाने रोपे तयार करुन ग्रामपंचायतीला द्यावीत.
आमदार श्री. सामंत यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये बचत भवन कुठे आवश्यक आहे, याबाबतचा आराखडा तयार करावा. दुग्धविकास विभागाने राजापूर येथे चिलींग प्लँट आणि कलेक्शन सेंटर तयार करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा. प्रत्येक तालुक्याला माती परिक्षण प्रयोग शाळा करण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव करावा. गुरांसाठी चारा म्हणून नेपीयर गवताची लागवड करावी. शिवाय ज्या गावात जी मागणी आहे त्याप्रमाणे रोपे द्यावीत. जलसंपदा विभागाने केटीवेअर चांगले करावेत. खारलँड गावात बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित करावीत. नवीन पुलांचे तसेच दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करताना छायाचित्रांसह प्रस्ताव द्यावा. या प्रस्तावांची प्रत माझ्याकडे द्यावी. शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही आमदार श्री. सामंत म्हणाले.
00

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button