
राज्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी; मुंबई, ठाणे, रायगडसह पालघरला रेड अलर्ट
महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सूनचा जोर वाढला असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) पालघर आणि रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.पालघर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत, गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी सर्व शैक्षणिक संस्थांना पूर्ण सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात सर्व अंगणवाड्या, सरकारी व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित संस्था, आश्रमशाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे बंद राहणार आहेत.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्या बंद राहतील. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत




