
“बाहेरच्या देशांतील रस्ते जाऊन पाहा, BMC ने आता तरी जागे व्हावे”; Bombay High Court कडून कानउघाडणी!
मुंबईतील खराब रस्ते आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महानगरपालिकेला (BMC) चांगलेच फटकारले. गेली दोन दशके हा प्रश्न कायम असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ‘आता तरी महापालिकेने जागे होऊन मुंबईतील खराब आणि खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न कायमचा सोडवावा’, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.
न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी झाली. ‘दहिसर ते फोर्ट असा प्रवास करणाऱ्या व्यक्तीला शेकडो धक्के सहन करावे लागतात. हे काय आहे? बीएमसीने आता तरी जागे व्हावे. न्या. लोढा यांनी २००७ मध्ये आदेश दिला होता आणि आता २०२६ उजाडले, तरी रस्त्यांची स्थिती तशीच आहे. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो आणि तुम्ही नवनवीन कारणे सांगता. ही कोणती वृत्ती?’ असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
‘जगातील प्रमुख शहरांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने रस्ते बांधले जातात. ते जाऊन पाहा. अशा रस्त्यांवर १०० किमी प्रतितास वेगाने वाहन चालवले तरी एकही धक्का बसत नाही,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘ठाण्यातील परिस्थिती तर मुंबईपेक्षाही वाईट आहे. पूर्वी तेथील रस्त्यांची स्थिती चांगली होती,’ असे न्या. गडकरी यांनी म्हटल्यावर न्या. खाटा यांनी उत्तर दिले की, तेव्हा न्या. अभय ओक (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती) दररोज ठाण्याहून फोर्टला प्रवास करत होते. त्यामुळे तेव्हा रस्त्यांची देखभाल होत होती.
न्यायालयाने मॅनहोलच्या झाकणांखाली संरक्षक जाळ्या बसविण्याच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. अद्याप तीन हजारांहून अधिक मॅनहोलना झाकणे आणि संरक्षक जाळ्या बसवायच्या बाकी असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. ‘आम्हाला आकडेवारी नको. यंदा मॅनहोलमुळे एकाही नागरिकाचा मृत्यू होणार नाही, अशी हमी द्या,’ असे न्यायालयाने म्हटले.




