मुंबई-गोवा महामार्गाला पुन्हा तडा; संगमेश्वरातील माभळे येथे रस्ता भराव खचल्याचा प्रकार


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे, पावसाचा वाढता जोर आणि भरावाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावाजवळ महामार्गाचा एक भाग खचल्याची घटना समोर आली आहे. गणेश हॉटेलसमोरील या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी रस्त्याचा शोल्डर खचून उताराच्या दिशेने सरकल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे या भागात आणखी खचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी करण्यात आलेल्या भरावाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहेत. अलीकडेच पूर्ण झालेल्या कामाची अशी अवस्था झाल्याने संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोकणातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला झालेली खचण भविष्यात अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर खचलेल्या भागाभोवती तातडीने बॅरिकेड्स, इशारा फलक आणि प्रकाशव्यवस्था उभारून कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात सावधगिरी बाळगावी, कमी वेगाने वाहन चालवावे आणि संबंधित ठिकाणी ओव्हरटेक टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, महामार्ग प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button