भोके रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा; शिवसेना युवतीसेनेचे अधिकाऱ्यांना निवेदन, विनायक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भोके फाटा ते भोके रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अपूर्ण काम आणि रखडलेले डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना नुकतेच एक जाहीर निवेदन देण्यात आले. हे निवेदन युवासेना युवती तालुका अधिकारी सौ. युक्ता योगेश आंबेकर यांच्या वतीने देण्यात आले असून, यावेळी रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांनी रेंगाळलेल्या कारभारावरून संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

या प्रसंगी योगेश आंबेकर देखील उपस्थित होते.या जोड रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून महामार्गाच्या कामानंतर रस्ता खोदण्यात आला, मात्र त्याचे डांबरीकरण अपूर्ण अवस्थेतच सोडून देण्यात आले. रस्त्याखाली मोऱ्या टाकल्यानंतर संबंधित काम पूर्ण न केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून चालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहनांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी तात्पुरत्या स्वरूपात टाकलेली खडी देखील पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने रस्ता दिवसेंदिवस अधिक खराब होत असून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना व ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने हे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा आणि संताप पाहता उपस्थित कार्यकारी अभियंत्यांनी यावर तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पावसाचा जोर आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन रस्त्यावरील खोल खड्डे तात्काळ योग्य प्रकारे भरण्याचे आणि अर्धवट राहिलेले मोऱ्यांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, तसेच पावसाचा अडथळा कमी होताच संपूर्ण रस्त्याचे गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पक्ष कटिबद्ध असून, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे काम विनाविलंब सुरू न झाल्यास प्रशासनाविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेवटी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button