
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे : पालकमंत्री डॉ. उदय सामंतजिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला आढावा…
आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. २५ ):- यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील आठवडाभरात पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्तीची समस्या उद्भवल्यास संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्णपणे सतर्क राहावे, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिल्या.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, तसेच सर्व तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.
भू-स्खलनाच्या ठिकाणी काळजी घ्या; पालकमंत्र्यांचे निर्देश
पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले की, गेल्या चार ते पाच दिवसांत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात कुठे नुकसान झाले असल्यास संबंधित विभागाने त्याची तातडीने माहिती घ्यावी. जिल्ह्यात ज्या ठिकाणी भू-स्खलनाचा (दरड कोसळणे) धोका आहे, तेथे प्रशासनाने आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. पावसाच्या काळात रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता वाहतूक नियंत्रण विभागाने घ्यावी. पावसामुळे दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाल्यास, मृतांच्या वारसांना तात्काळ मदत देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि महावितरण या सर्वच महत्त्वाच्या विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून चोवीस तास सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात ११८ संवेदनशील ठिकाणे निश्चित : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात आपत्तीच्या दृष्टीने ११८ धोक्याची ठिकाणे शोधण्यात आली असून, त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी यावेळी दिली.




