मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागातील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव (रत्नागिरी) येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ संजय भावे आणि कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभाग सहयोगी अधिष्ठाता डॉ वरवडेकर, तसेच जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था चे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दिनांक २२ जून रोजी सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाद्वारे श्री. सुशील शिवलकर, प्राचार्य ( डायट), श्री. राहुल बर्वे, वरिष्ठ अधिव्याख्याता ( डायट), डॉ. लहू आचारेकर, अधिव्याखता ( डायट), श्री. अमर घाटगे, केंद्रप्रमुख, शिरगांव तसेच डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटन पर भाषणात डॉ चौधरी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभव आधारित शिक्षण पद्धतीच्या बदलाबद्दल माहिती दिली . श्री सुशील शिवलकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अवलंबल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीचे विविध टप्पे विस्तारित स्वरूपात मांडले .
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वीच्या शिक्षकांसाठी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सुमारे ८४ शिक्षकवर्गीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले .
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथील परिषद दालन, वर्गखोल्या, प्रशिक्षणार्थीची निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे करण्यात आली होती . प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहील्याने, त्यांना आधुनिक शैक्षणिक वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून अध्यापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचून संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा व्यापक प्रसार होण्यासही हातभार लागणार आहे.
जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय अधिक दृढ होणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button