
‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली नवी दिशा
हस्तकला, संगीत, मूर्तिकला आणि पर्यावरण संवर्धनाचे विद्यार्थ्यांनी गिरवले धडे


चिपळूण : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने श्री विठ्ठलराव जोशी चारिटेज ट्रस्ट इंग्रजी माध्यम शाळेत व्यावसायिक व कौशल्य शिक्षणांतर्गत ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हस्तकला, चित्रकला, मूर्तिकला, संगीत आणि पर्यावरण संवर्धनाशी निगडित विविध उपक्रमांमधून आपल्या सृजनशीलतेचा आविष्कार घडविला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी मॅट रांगोळी, मोनो प्रिंट, कोलाज वर्क, वारली कला, ओरिगामी, मास्क निर्मिती, भरतकाम, कागदी फुले, गिफ्ट बॅग, आकर्षक शोभेच्या वस्तू, एब्स्ट्रॅक्ट आर्ट, पेपर कप आकाशकंदील, कॅन्डल, दिवाळी पणत्या, फ्लॉवर पॉट, कार्टून पेंटिंग, पेपर गारलँड आणि पेट हाऊस अशा विविध उपक्रमांत सहभाग घेतला. शाळेची माजी विद्यार्थिनी कु. मैथिली सुवारे हिने विद्यार्थ्यांना फ्लॉवर बास्केट, कोलाज आणि वारली आर्टचे प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘पक्षी घर निर्मिती’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. पक्षी अभ्यासक श्री. राजगोपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक पक्षी घरांची माहिती देत प्रत्यक्ष सुतारकामाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी लाकडी पक्षी निवारे तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
मूर्तिकला कार्यशाळेत दिलीप ठकार आणि सौ. दर्शना ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती आणि विविध मातीच्या वस्तू साकारल्या. यंदाच्या कार्यशाळेचे आकर्षण ठरलेल्या अम्ब्रेला पेंटिंग उपक्रमात विद्यार्थ्यांनी निसर्ग, फुले, पक्षी आणि वारली कलेवर आधारित आकर्षक चित्रे रेखाटून आपली कलात्मकता सादर केली.
याशिवाय, तबला, हार्मोनियम आणि गायन कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्राची प्राथमिक ओळख करून देण्यात आली. शंकर चव्हाण, सौ. ओवी शेंबेकर आणि स्वामिनी मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वर, लय, ताल आणि विविध वाद्यांची माहिती देत प्रत्यक्ष सराव करून घेतला.
पूर्णपणे निःशुल्क आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी आवश्यक सर्व साहित्य शाळेतर्फे उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, सौंदर्यदृष्टी, निरीक्षणशक्ती, समस्या निराकरण क्षमता आणि स्वावलंबन यांसारख्या गुणांचा विकास झाला असून शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालकांनीही विशेष कौतुक केले.




