
देवरूखचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना पदोन्नती
संगमेश्वर : देवरूखमध्ये पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना पदोन्नती जाहीर करण्यात आली असून, राज्याच्या गृह विभागामार्फत सेवा जेष्ठतेनुसार रायगडमध्ये पोलीस उपअधीक्षकपदी रूजू होणार आहेत.
श्री. झावरे यांनी देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून ते आजपर्यंत अतिशय चांगली कामगिरी बजावली आहे. कडक शिस्तीचे व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून उदय झावरे यांनी पोलीस दलात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी त्यांनी बजावली आहे. देवरुखच्या केतकर ज्वेलर्सच्या मालकांवर टाकलेल्या दरोड्यातील आरोपीना त्यांच्या नेतृत्वाखाली तातडीने शोध शोधून ताब्यात घेण्यात आले होते. येत्या २७ जूनला देवरूखच्या पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी स्विकारून त्यांना एक वर्ष पूर्ण होणार होते.
आता त्यांना राज्याच्या गृह विभागामार्फत सेवा जेष्ठतेनुसार रायगडमध्ये पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल पोलीस दलातील सहकाऱ्यांसह सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




