
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
राज्यात गेल्या २ आठवड्यांपासून रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल सकाळपासूनच मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. आज विदर्भात उष्ण हवामान आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह कोकणात जोरदार सरींची आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान मुंबईसाठी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून अनेक भागांत पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण हवामानासोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान, कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई , ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय सातारा जिल्ह्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.




