रत्नागिरी पोलीस दलाच्या “रेड्स” ॲपद्वारे अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी अभिनव उपक्रम

एआय री कन्स्ट्रक्टेड इमेजेसवरून ओळख पटत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

मंडणगड : तालुक्यातील शिपोळे व उमरोली जेट्टी दरम्यान, सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रात खाजन परिसरात ९ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून, रेड्स ॲपच्या माध्यमातून मृत व्यक्तीचे संभाव्य स्वरूपाचे एआय री कन्स्ट्रक्टेड इमेजेस तयार करण्यात आले आहे.


मृतदेहाची ठळक वैशिष्टे अशी : मृताचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, त्याच्या अंगावर मळलेला तसेच फाटलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट होता. तसेच निळ्या रंगाची पूर्ण लांबीची पँट व त्यास लेदरचा बेल्ट आणि अंतर्वस्त्र म्हणून निळ्या रंगाची पूर्ण लांबीची अंडरवेअर परिधान केलेली होती. मृत व्यक्तीच्या उजव्या मनगटावर निळ्या रंगाचा हृदयाच्या आकाराचा गोंदलेले (टॅटू) असून, त्या टॅटूमध्ये काही अक्षरे/खुणा कोरलेल्या आहेत. मात्र ही अक्षरे अस्पष्ट व वाचता न येण्यासारखी आहेत.


या बाबतची माहिती बाणकोट पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मितेश केणी यांनी पोलीस अधीक्षक, कार्यालय रत्नागिरी येथे दिल्यावरून रत्नागिरी पोलीस दलाच्या “RAIDS” ॲपच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून रत्नागिरी पोलीस दलामार्फत मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अज्ञात मृतदेहाची ओळख लवकरात लवकर पटविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाच्या “RAIDS” (Rapid Al-based Identification & Detection System) ॲपचा वापर करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेहाचे उपलब्ध छायाचित्र RAIDS ॲपवर अपलोड करून त्यावर एआय-आधारित प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे मृत व्यक्तीच्या उपलब्ध छायाचित्रावर आधारित त्याच्या संभाव्य स्वरूपाचे/प्रतिरूपाचे विविध एआय री कन्स्ट्रक्टेड इमेजेस तयार करण्यात आले आहेत. या मृत व्यक्तीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास अथवा प्रसारित करण्यात येणाऱ्या एआय री कन्स्ट्रक्टेड इमेजेस वरून व्यक्तीची ओळख पटत असल्यास त्यांनी तात्काळ बाणकोट पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button