
कुरधुंडा हायवे परिसरातील जुनी विद्युत डिपी अखेर बदलली; महावितरणकडून दिलेला शब्द पूर्ण. माजी सरपंच नाझीमा बांगी यांच्या मागणीला यश;
माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक नाझीमा बांगी यांनी मानले महावितरण, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे आभार
कुरधुंडा हायवे परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला विद्युत पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. परिसरातील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली जुनी विद्युत डिपी (डिस्ट्रिब्युशन पॅनेल) बदलण्याची मागणी अखेर पूर्ण झाली असून, महावितरणकडून नवीन डिपी बसविण्यात आली आहे.
जुन्या डिपीमुळे वारंवार विद्युत तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. याचा त्रास नागरिक, व्यावसायिक तसेच परिसरातील ग्राहकांना सहन करावा लागत होता. या समस्येबाबत ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नागरिकांची गरज लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत डिपी बदलण्याचे आश्वासन दिले होते. अखेर महावितरणने दिलेला शब्द पूर्ण करत काम पूर्ण केले आहे.
या कामामुळे कुरधुंडा हायवे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, विद्युत पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. गावातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हे काम पूर्णत्वास गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी कुरधुंडा गावच्या माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक नाझीमा बांगी यांनी गावच्या वतीने महावितरण विभागाचे आभार मानले. तसेच या प्रश्नाकडे लक्ष देऊन सहकार्य केल्याबद्दल राज्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचेही विशेष आभार व्यक्त केले.
“गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी यापुढेही गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू,” अशी भावना नाझीमा बांगी यांनी व्यक्त केली.
कुरधुंडा हायवे परिसरातील हा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, महावितरणच्या या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत आहे.




