
हृदयविकारावरील बचावासाठी योग प्रभावी असल्याचे पुरावे
मुंबई : योग हा केवळ आध्यात्मिक साधना किंवा शरीर लवचिक ठेवण्याचा मार्ग नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेतील एक प्रभावी वैज्ञानिक उपाय असल्याचे ठोस पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. विशेषतः हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता आणि तणावाशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मत देशातील आघाडीच्या हृदयरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अलीकडे दिल्लीतील एम्समधील ह्रदयविकार तज्ज्ञांनी केलेल्या संशोधन आणि क्लिनिकल चाचण्यांमधून योगाचे आरोग्यविषयक फायदे असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.
भारतामध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहेत. बदलती जीवनशैली, बैठी कामे, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि वाढता मानसिक तणाव यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, इन्सुलिन प्रतिकारशक्ती आणि लठ्ठपणा यांसारखे जोखीम घटक झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर योगासारख्या पारंपरिक पद्धतीकडे आधुनिक वैद्यकशास्त्र नव्या दृष्टीने पाहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आलेले हे निष्कर्ष योगाविषयीची धारणा बदलणारे ठरत आहेत. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या योगाला आता आधुनिक विज्ञानाचीही साथ मिळत असून भविष्यातील आरोग्य धोरणांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा महत्त्वाचा घटक म्हणून त्याचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संशोधनातून असे दिसून आले आहे की नियमित एरोबिक व्यायामासोबत योगाचा समावेश केल्यास रक्तदाबात लक्षणीय घट होते. एका अभ्यासात योग करणाऱ्या व्यक्तींमध्ये सिस्टोलिक रक्तदाब सरासरी १० मिमीएचजीने कमी झाल्याचे आढळले, तर केवळ स्ट्रेचिंग करणाऱ्यांमध्ये ही घट चार मिमीएचजीपर्यंत मर्यादित होती. याशिवाय हृदयगती कमी होणे आणि भविष्यातील हृदयविकाराचा धोका घटणे यांसारखे फायदेही नोंदवले गेले.
व्यग्र दिनचर्येतही आधुनिक योगसाधना शक्य
योगाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम मानसिक तणावावर होतो. आधुनिक जीवनशैलीमुळे शरीरात सतत ‘सिम्पथेटिक ओव्हरड्राइव्ह’ निर्माण होतो, ज्यामुळे तणावाचे हार्मोन्स वाढतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे ‘पॅरासिम्पथेटिक’ प्रणाली सक्रिय होते. परिणामी कोर्टिसोलसारख्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते, रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील दाहक प्रक्रिया कमी होतात.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मानसिक तणाव हा हृदयविकाराचा अनेकदा दुर्लक्षित राहणारा मोठा घटक आहे. उच्च तणाव किंवा नैराश्य असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीहून अधिक असतो. अशा परिस्थितीत योग तणाव कमी करून हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करू शकतो.योगाचे फायदे केवळ प्रतिबंधापुरते मर्यादित नसून पुनर्वसन प्रक्रियेतही त्याचा उपयोग होत आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये योगामुळे जीवनमान सुधारते, चिंता कमी होते आणि शारीरिक क्षमताही वाढते असे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. काही संशोधनांमध्ये हृदयाच्या ठोक्यांतील अनियमितता कमी होण्यासही मदत झाल्याचे दिसून आले आहे.
योगामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते, याचेही पुरावे उपलब्ध आहेत.पीजीआयएमईआर चंदीगडच्या अभ्यासात केवळ एका महिन्याच्या योगाभ्यासानंतर ‘चांगले’ एचडीएल कोलेस्टेरॉल वाढले आणि ‘वाईट’ एलडीएल कोलेस्टेरॉल कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे हृदयविकार प्रतिबंधासाठी योग हा कमी खर्चिक आणि प्रभावी जीवनशैली बदल ठरू शकतो, असे संशोधकांचे मत आहे.तज्ज्ञांच्या मते योग हा औषधोपचारांचा पर्याय नसला तरी तो उपचारांना पूरक ठरतो.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन यांसोबत योगाचा समावेश केल्यास हृदयविकारांचा धोका कमी करता येऊ शकतो. विशेष म्हणजे, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि पारंपरिक भारतीय ज्ञान यांचा संगम साधणारे हे साधन आता वैज्ञानिकदृष्ट्या अधिकाधिक मान्यता मिळवत आहे.




