
आंबा बागायतदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवण्याची मागणी
हवामानातील बदलांचा फटका; ८० टक्के मोहर नष्ट झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात
रत्नागिरी : यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमित बदलांमुळे आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील बागायतदार गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अवकाळी पाऊस, अनियमित थंडी आणि त्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे आंब्याच्या मोहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ व वास्तवदर्शी अहवाल तातडीने राज्य शासनाकडे सादर करावा, अशी मागणी विविध आंबा उत्पादक संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ तसेच करबुडे रवळनाथ संघ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, यंदा आंबा पिकाला अपेक्षित प्रमाणात मोहर आला नाही. त्यातच वाढलेल्या उष्णतेमुळे सुमारे ८० टक्के मोहर काळा पडून गळून गेला. परिणामी, बहुतांश बागायतदारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.
याशिवाय, २०१५ पासून आंबा उत्पादकांना वारंवार विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रखडलेली कर्जमाफी तातडीने लागू करण्यात यावी, तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बागायतदारांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना ज्येष्ठ बागायतदार प्रकाश साळवी यांच्यासह विविध भागांतील आंबा उत्पादक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते




