जयगड जे एस डब्ल्यू पोर्ट परिसरात शेडचे काम सुरू असताना ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू


जयगड येथील जे एस डब्ल्यू कंपनीच्या शेडचे काम सुरू असताना काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा तब्बल ४५ मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१३ जून) उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव राजुकुमार बालेश्वर सिंह (रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, बिहार) असे आहे. ते पोर्ट परिसरातील बी-५ कोल शेडवर उंचावर लोखंडी पर्लिंगचे काम करत होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामाची वेळ संपल्यानंतर राजुकुमार हे इतर सहकाऱ्यांसोबत खाली उतरत होते. त्यावेळी त्यांनी सुरक्षा हुकचा वापर केला होता. मात्र, पुढे सरकताना हुक बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो व्यवस्थित अडकला नाही. त्याच वेळी त्यांचा पाय फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनाचा ताण सहन न झाल्याने पत्रा तुटला आणि राजुकुमार तब्बल ४५ मीटर उंचीवरून थेट जमिनीवर कोसळले.
या भीषण अपघातात त्यांच्या हाताला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button