तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता औषधांकडे; डॉक्टरांसह मेडिकल चालकांना कडक निर्देश


अनेकदा डॉक्टर अमुक एका औषधांच्या दुकानांमधून औषध घ्या, असा आग्रह करतात. मात्र, रुग्णांना त्यांना हव्या असणाऱ्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे विकत घेण्याचा अधिकार त्यांना आहे.रुग्णांना विशिष्ट औषधांच्या दुकानातून औषधे घेण्यास भाग पाडू नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

या निर्देशांचे उल्लंघन करणारी रुग्णालये, डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी देण्यास नकार दिल्यास, विशिष्ट औषधाच्या दुकानातूनच औषधे घेण्याची सक्ती केल्यास किंवा अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित विभागीय कार्यालय अथवा अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले आहे. शारीरिक व्याधींसाठी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना त्या रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषधांच्या दुकानामधून औषधे विकत घेण्यासाठी आग्रह केला जातो. काहीवेळा त्या संबंधित औषधांच्या दुकानामध्ये औषध नसतात तरीही त्या रुग्णांच्या कुटुंबीयांना ताटकळत राहावे लागते.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करू शकता याची माहिती रुग्णालयांनी देणे बंधनकारक आहे. तसेच सर्व रुग्णालयांनी यासंदर्भात दर्शनी भागामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये सूचनाफलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर रुग्णांना रुग्णालयातील औषधविक्री केंद्रातून औषधे खरेदी करण्याची सक्ती नसून ते कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करू शकतात, असा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. अशा प्रकाराची गंभीर दखल घेत तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांना स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही रुग्णाला विशिष्ट औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या हाती देणे बंधनकारक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button