
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा भाजपकडून आढावा; आमदार प्रमोद जठार यांनी मांडला विकासाचा लेखाजोखा
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांचा, विकासकामांचा आणि प्रशासनातील बदलांचा आढावा घेत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.
आमदार जठार यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून विविध जनकल्याणकारी योजनांमुळे नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. तसेच देशात सलग स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याने विकास प्रक्रियेला गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत बोलताना त्यांनी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (DBT) प्रणालीमुळे शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे सांगितले. शेतकरी सन्मान निधी, उज्वला योजना, महिला सन्मान योजना यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी डिजिटल व्यवहारांना चालना मिळाल्याचे नमूद केले. जीएसटी अंमलबजावणी, नोटाबंदी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे आर्थिक व्यवस्थेत पारदर्शकता वाढल्याचा दावाही त्यांनी केला.
सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाच्या जतनासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला. अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाल्याचे ते म्हणाले.
देशाच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, अन्नसुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातही केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याचे जठार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी राजू भाटलेकर ऋषिकेश केळकर, ओंकार फडके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




