
शिपोशी येथील एका तरुणीच्या प्रकरणावरून लांजा पोलीस ठाण्यात निवेदन; सखोल चौकशीची मागणी
लांजा शिपोशी येथील एका तरुणीच्या प्रकरणावरून शिपोशी पंचक्रोशीतील नागरिक, विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने लांजा पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना सादर करण्यात आले.
निवेदनात एका अल्पसंख्यांक समाजातील तरुणावर हिंदू तरुणीला फूस लावून तिची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रेमसंबंधांच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून आणि दबाव निर्माण करून तरुणीला तिच्या कुटुंबापासून दूर नेण्यात आल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.
तरुणी सध्या दबावाखाली असल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला असून, तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित तरुणीची स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे चौकशी करून तिची स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात देशातील अशा प्रकारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्व संबंधित बाबींची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, या प्रकरणात संबंधित तरुणाला मदत केल्याचा संशय असलेल्या व्यक्तींचीही चौकशी करून आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाची कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.




