मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कशेडी घाटात कार डंपरखाली घुसली, मुलाचा मृत्यू आई गंभीर जखमी..


मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून सोमवारी (दि. ८ जून) दुपारी एकच्या सुमारास कशेडी घाटातील भोगाव हद्दीत भीषण अपघात घडला. भरधाव कार पुढे जात असलेल्या डंपरच्या मागील बाजूस घुसल्याने कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एमएच-०५-सीए-३३६७ क्रमांकाची कार चालक निकेश बालन याच्या ताब्यात होती. कशेडी घाटात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागावर आदळली. अपघातात निकेश बालन आणि त्यांची आई लीसी बालन (वय ६३, रा. कल्याण) गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार व अन्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान निकेश बालन यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या लीसी बालन यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते व लक्ष्मण कळंबे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार व डंपर रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button