
कोकण रेल्वे मार्गावरून जुलैमध्ये धावणार पहिली कंटेनर रेल्वे
प्रादेशिक लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि मालवाहतूक क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे महामंडळाने दि. ३ जून २०२६ रोजी रत्नागिरी येथे उच्चस्तरीय ’ट्रेड मीट’ आयोजित केली. या बैठकीत मालवाहतूक क्षेत्रातील ग्राहकांशी संवाद साधून कोकण रेल्वेच्या नव्याने विकसित करण्यात आलेल्या तसेच आगामी मालवाहतूक सुविधांची माहिती देण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी भूषविले. यावेळी संचालक (मार्ग व बांधकाम), मुख्य परिचालन व्यवस्थापक, प्रादेशिक रेल्वे – व्यवस्थापक (रत्नागिरी), प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक (कारवार) तसेच केंद्रीय गोदाम महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रत्नागिरी परिसरातून जवाहरलाल नेहरू बंदर, मुंबई येथे कंटेनर वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या संधींवर विशेष चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर जुलै २०२६च्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीतून पहिली समर्पित कंटेनर रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाच्या व्यावसायिक यशासाठी केंद्रीय गोदाम महामंडळाने व्यापार भागीदारांना स्पर्धात्मक आणि आकर्षक दर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत खत, धान्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीशी संबंधित अनेक व्यापारी व उद्योग प्रतिनिधींनी सहभाग घेतला. तसेच जयगड बंदर आणि आंग्रे पोर्ट येथील वरिष्ठ प्रतिनिधींची उपस्थितीही लक्षणीय ठरली. यामुळे भविष्यात सागरी आणि रेल्वे मालवाहतुकीमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.www.konkantoday.com




